• Recent

  कर्मवीर भाऊराव पाटील / Karmveer Bhaurav Patil


  इंग्रजी सहावीत नापास झाल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. तीच त्यांच्या जीवनाची सुरवात होती. कर्मवीर भाऊराव पाटील सामजिक परिस्थिती विषयी अतिशय संवेदनशील होते. इथल्या अनेक समस्यांवर शिक्षण हाच उपाय आहे हे त्यां नी ओळखले. त्यातूनच ग्रामीण भागातील समाजासाठी त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळ सुरु केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करुन तळागाळातील स माजासाठी ज्ञानाची दारे खुली केली.  वर्गमित्र आत्मारामपंत ओगल्यांच्या काच कारखान्यात भाऊराव पाटील नोकरीला होते, त्या वेळची ही गोष्ट. हा कारखाना तेव्हा किर्लोस्करवाडीला होता. हाती घेतलेले काम सर्वस्व झोकून पूर्ण करायचे, ही त्यांची खासीयत. सचोटी, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी कारखान्याची भरभराट करून दाखवली. त्यांचे काम पाहून लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ओगल्यांकडे भाऊरावांची मागणी केली. मग भाऊराव त्यांच्याकडे काम करू लागले. उत्पादन वाढले, विक्री वाढली, त्यात भाऊरावांचा मोठा वाटा होता. नांगराची विक्री करताना ते अक्षरशः तहानभूक विसरून जायचे. शेतकरी, व्यापाऱ्यांना लोखंडी नांगराचे महत्त्व पटवून द्यायचे. प्रस ंगी स्वतः शेतात नांगर चालवून दाखवायचे. त्यामुळे भाऊरावांचा पगार वाढला. त्या काळी सोन्याचा भाव होता वीस रुपये तोळा. आणि दोन रुपयाला पोतंभर ज्वारी मिळायची. तेव्हा भाऊरावांचा मासिक पगार होता नव्वद रुपये. विक्रेता म्हणून काम करताना त्यांनी खूप पायपीट केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजाची दुःखे जवळून पाहिली. त्यांच्या अज्ञानाचा कसा गैरफायदा घेतला जातो आहे, अंधश्रद्धा आणि जातीपातींमध्ये तो कसा अडकला आहे, हे त्यांनी पाहिले. गरीब, अस्पृश्‍य, मजूर यांची जगण्यासाठीची केविलवाणी धडपड त्यांनी बघितली. जन्मापासून मृत्यूपर्यंत धर्माच्या नावाखाली त्याला कसे लुबाडले जाते, हे त्यांनी पाहिले. या गुलामीतून त्यांची मुक्तता कशी होईल, अंधश्रद्धा कशा दूर होतील, त्यांच्या पोटात चार घास कसे पडतील, असे प्रश्‍न त्यांना सतावू लागले. यावर एकच उत्तर आणि ते म्हणजे शिक्षण, हे त्यांनी जाणले आणि त्या कार्यात पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला.  कष्टांची लाज न वाटणे, कोणतेही काम कमीपणाचे किंवा प्रतिष्ठेचे न मानणे, आपल्या गरजा कमीत कमी करणे, खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणे, चारित्र्य, सेवा, देशप्रेम, त्याग यांसारख्या गुणांची जोपासना करण्याचे काम कर्मवीर अण्णा वस तिगृहात जाणीवपूर्वक करत. पैशावाचून गरिबाचे शिक्षण अडू नये, बहुजन स माजातील मुलेही बुद्धीने हुशार असतात, याची त्यांना जाणीव होती. शिक्षण आणि वसतिगृहातील सहजीवनातून जातपात संपेल, असा विश्‍वास त्यांना वाटत होता. त्यामुळेच विरोध असतानाही त्यांनी सर्व जातिधर्मांची मुले वसतिगृहात एकत्र ठेवली होती. वसतिगृहात त्यांनी "कमवा शिका' योजना सुरू केली. केवळ पुस्तकी विद्वान न बनता, व्यावहारिक शिक्षणाची जोड मुलांच्या आयुष्याला मिळाली. या योजनेत मुलांना शेतीची सर्व कामे करणे, जनावरे सांभाळणे, मुरुम खोदणे, खडी फोडणे, सुतार, गवंडी अशा कारागिरांच्या हाताखाली मुलांना काम करावे लागे. विटा तयार करणे, विहीर खोदणे अशीही कामे करावी लागत. ही कामे करूनही नियमित अभ्यासात मुले कुठेही कमी पडू नयेत याबाबत ते दक्ष असत. कष्टांची कामे केल्यामुळे बुद्धीवर किंवा यशावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे कर्मवीरांच्या वसतिगृहात राहून तयार झालेला विद्यार्थी अशा गुणांची श्रीमंती घेऊन बाहेर पडत असे. त्यामुळे ते समाजात उठून दिसत. त्यातून कर्मवीरांच्या कार्याकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. १९२४ मध्ये एक विद्यार्थी घेऊन त्यांनी वसतिगृह सुरू केले होते. पुढे वाढत वाढत वसतिगृहांची संख्या सत्तर -ऐंशीपर्यंत गेली. त्याचबरोबर त्यांनी खेडोपाडी शाळा सुरू करण्याचा ध्यास घेतला होता. त्यात अनेक अडचणी आल्या. गावाला शाळेची गरजच काय, इथपासून लोकांचे प्रश्‍न सुरू होत. अनेक गावांमध्ये शाळा सुरू करावी की नको, या विषयावर लोक देवाला कौल लावत.  अशा वेळी कधीकधी कर्मवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खोटेपणा करावा लागे. अनुकूल कौल लावून घेतल्यावर शाळा सुरू करता येत असे. अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी ते चालत गेले, कधी बै लगाडीने गेले. प्रसंगी घोड्यावरून गेले. सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात त्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. १९५० पर्यंत त्यांनी सातारा-कोल्हापूर परिसरात सुरू केलेल्या शाळांची संख्या ५७८ वर गेली. बहुजन समाजातील मुले शिकू लागली होती. अनेक गावांत पत्र आले तर वाचून घेण्यासाठी दुसऱ्या गावातील वाचता येणाऱ्या व्यक्तीकडे जावे लागत असे. मणभर लाकडे फोडून दिल्यावर पत्र वाचून त्यातील मजकूर समजत असे. आता घराघरात ज्ञानाचा दिवा प्रकाशत होता. त्यामुळे पत्र वाचण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जाणे बंद झाले. एव्हाना संस्थेचे ना मकरण रयत शिक्षण संस्था असे झाले होते. १९४७ मध्ये त्यांनी साताऱ्यात महा विद्यालय सुरू केले. सगळ्या जाती-धर्मांच्या मुलांना घेऊन अण्णांनी शिक्षणप्रसाराचे काम सुरू केले होते. त्याच पद्धतीने सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांनी या महा विद्यालयाला दिले. देणगी घेऊन, पैशाच्या जोरावर हे नाव बदलण्यास त्यांनी ठाम नकार दिला. त्याचप्रमाणे बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या नावानेही त्यांनी साताऱ्यात हायस्कूल सुरू केले. अर्थात त्यासाठी कोणतीही मदत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळू शकली नाही. समाजातील कर्मकांड, अज्ञान, अं धश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर सडकून टीका करत समाजाला शहाणे करण्याचे व्रत ज्या माहात्म्याने आयुष्यभर घेतले होते, त्या संत गाडगे महाराजांच्या नावाने त्यांनी १९५४ मध्ये कराडला महाविद्यालय सुरू केले.  जो बहुजन समाज धार्मिक विधी आणि कर्मकांडांच्या ओझ्याखाली अज्ञानात वर्षानुवर्षे पिचत होता, त्या समाजाला अण्णांनी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. एवढेच नव्हे, तर अठराविश्‍व दारिद्य्र असणाऱ्या कुटुंबांतील अनेक मुलांना त्यांनी आपल्या खांद्यावर बसवून वसतिगृहात आणले. त्यांची देखभाल केली. त्यांना अपार प्रेम दिले. शिक्षणाबरोबरच कष्टांचे संस्कार त्यांच्या मनावर केले. त्याचा परिणाम म्हणून धर्माच्या ग्लानीत पडलेला समाज जागृत झाला. नव्या महाराष्ट्राची उभारणी होत असताना अण्णांच्या मुशीतून घडलेल्या अनेक नामवंतांनी त्यात योगदान दिले.

  कर्मकांडांना विरोध आणि सडेतोड स्वभाव यामुळे भाऊरावांना शाळेत शिकत असताना कोल्हापुरातील वसतिगृह सोडावे लागले. त्यांच्या एका वर्गमित्राच्या मदतीने त्यांना शाहू महाराजांचे कृपाछत्र लाभले. तेथे त्यांना भरपूर खुराक मिळाला. त्यांची प्रकृती दणकट आणि मजबूत बनली. त्यांना कुस्त्यांची आवड लागली. कधी-कधी ते राजवाड्यातील मुलांबरोबर क्रिकेटही खेळत. एकदा बॅटिंग करताना त्यांनी सगळी ताकद लावून चेंडू टोलावला आणि राजवाड्याच्या खिडकीची काच फ ुटली. चेंडू इतका उंच आणि लांब जाईल याची कुणालाच कल्पना नव्हती. आता महाराज शिक्षा करणार म्हणून सगळी मुले घाबरली. सगळ्या मुलांना महाराजांसमोर उभे राहण्याची वेळ आली.

  महाराजांनी विचारले, ""क्रिकेट कोण खेळत होते?''

  ""आम्ही राजवाड्यातील मुले,'' त्यातील धीट मुले म्हणाली.

  त्यावर प्रश्‍न आला, ""काचेवर कुणी चेंडू मारला?''

  भाऊराव पुढे होऊन धीटपणे म्हणाले, ""महाराज खिडकीची काच मी मारलेल्या चेंडूमुळे फुटली. एवढा उंच चेंडू जाईल, असे मला वाटले नव्हते.''

  ""म्हणजे तुझ्याकडून गुन्हा झाला आहे,'' महाराज म्हणाले.

  ""होय महाराज, पण मुद्दाम नाही; चुकून घडले. जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे,'' भाऊराव म्हणाले.

  हे ऐकून महाराजांचा चेहरा फुलला. खरे बोलण्यावर ते खूष झाले आणि म्हणाले, ""तुला माझी भीती कशी वाटली नाही?''

  भाऊराव म्हणाले, ""त्यात कसली भीती? चूक झाल्यावर जे घडले ते खरे सांगायचे आणि मिळेल ती शिक्षा भोगायची.''

  त्यावर महाराज म्हणाले, ""तू खरे बोललास म्हणून तुला शिक्षा माफ. जा पळ आता.''


  साताऱ्यातील धनिणीच्या बागेत वसतिगृह सुरू झाले होते. तिथे साठ-सत्तर मुले राहून काम करून शिकत होती. अनेकदा कर्मवीर देणग्या मिळवण्यासाठी बाहेर पडले, की चार-सहा दिवस परत येत नसत. तोपर्यंत एखाद्या वेळी वसतिगृहातील धान्य संपून जात असे. दुकानदार उधारीवर देत नसत. कारण पूर्वीची उधारी शिल्लक असायची. धान्याचा कण शिल्लक नाही म्हटल्यावर वसतिगृहाचा सेक्रेटरी व हिनींकडे म्हणजे अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाईंकडे येत असे. अण्णा आले का, विचारल्यावर नकारार्थी उत्तर मिळत असे. पण कशासाठी विचारल्यावर तो प रिस्थिती सांगायचा. मग त्या म्हणायच्या, ""असे कर, हा माझा दागिना घे; मोडून आलेल्या पैशाची ज्वारी आणा आणि स्वयंपाक करा.'' मग तो सेक्रेटरी जात असे आणि व्यवस्था करत असे. असे करता-करता लक्ष्मीबाईंनी त्यांच्याकडील ऐंशी- नव्वद तोळे दागिने विकले. गोरगरिबांची मुले शिकावीत म्हणून एवढा त्याग करणारी माउली दुसरी सापडणार नाही. सगळे दागिने संपल्यावर जेव्हा पुन्हा तशीच वेळ आली, तेव्हा भुकेल्या मुलांच्या तोंडाकडे पाहवत नाही म्हणून त्यांनी गळ्यातील मं गळसूत्र काढून पुडीत बांधून मोडण्यासाठी दिले. बहुजन समाजातील मुले शिकावीत, हा समाज अंधकारातून बाहेर पडावा, त्याने प्रगती करावी म्हणून या माउलीने केलेल्या त्यागाची तुलना करता येणार नाही.

  - सुहास यादव
  ________________________________________________________________________________