• Recent

  मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल

  प्राध्यापक मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल (जन्म: २४ जुलै १९३२; मृत्यू : मुंबई, २ जुलै, २०१७) हे मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. ते मूळचे अहमदनगरचे होते. त्यामुळे त्यांना अहमदनगरला २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन करावयचा मान मिळाला.  मामा तोरमडल यांच्या अभिनयाची सुरुवात ही मुंबईतून शाळेपासूनच झाली. तिथे त्यांच्या ‘नाटकी’पणाचा पाया घातला गेला. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘शेठ आनंदीलाल पोद्दार’ ही त्यांची शाळा. शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक त्यांनी बसविले. दिग्दर्शन व अभिनयही त्यांनी केला. पुढे शाळेचे स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमातून नाटक बसविण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमलांकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली.
  शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधुकर तोरडमलांनी कुर्ला येथे ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत काही काळ ‘लिपिक’ म्हणून कान केले. त्यानंतर ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके त्यांनी केली. राज्य नाट्य स्पर्धेतूनही ते सहभागी झाले. स्पर्धेत त्यांनी ‘एक होता म्हातारा’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे त्यांना ‘मामा’ ही बिरुदावली मिळाली आणि पुढे सगळेजण त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे ‘मामा’ झाले. राज्य नाट्य स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा होऊ लागली. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याने नोकरी सांभाळून ते नाटक करत होते. ही कसरत महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस यांनी पाहिली. त्यांनी तोरडमलांना ‘व्यावसायिक रंगभूमीवर जायचे असेल तर जरूर जा. एक वर्षभर काम करून बघ. नाही जम बसला तर पुन्हा इकडे महाविद्यालयात शिकवायला ये’, असे सांगितले आणि तोरडमल मुंबईत आले आणि तिथे रंगभूमी क्षेत्रात नावलौकिक मिळवला. तोरडमलांना लोक मामा म्हणत असल्याने त्यांनी आपल्या उत्तर-आयुष्यातल्या आठवणी ’उत्तरमामायण’ नामक पुस्तकात सांगितल्या आहेत. मामांची स्वतःची रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था होती.
  तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५०००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्‍चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’बालगंधर्व’ नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे ३ प्रयोग झाले. ‘बालगंधर्व’च्या त्या प्रयोगांना येणार्‍या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख श्री. बाळ ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.

  तोरडमल यांनी ‘नाट्यसंपदा’, ‘नाट्यमंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाट्यसंस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. अखेरचा सवाल’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘चाफा बोलेना’, ‘बेईमान’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे.

  कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘आत्मविश्वास’, ‘आपली माणसं’, घायाळ, जमलं हो जमलं, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, राख, ‘शाब्बास सूनबाई’ ‘सिंहासन’, या मराठी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका होत्या.
  --साभार- विकिपीडिया.कॉम

  Web Title : Madhukar Toradmal alis Mama Toradmal