खर्ड्याचा उर्फ शिवपट्टणचा किल्ला / Kharda alias Shivapattana Fort
(ता-जामखेड, अहमदनगर)
पानिपत च्या युद्धामध्ये मराठेशाही ची अपरिमित जीवित व वित्त हानी झाली नंतर पेशवाई लाभलेले माधवराव पेशवे यांनी राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पण या पेशव्याचा सुध्दा तरूणपणातच मृत्यू झाल्याने स्वराज्याचे सर्व शत्रू हळुहळू डोके वर काढू लागले, राज्याचे लचके तोडू लागले.सर्व मराठी सरदारांनी एकत्र येऊन लढण्याचं अग्निदिव्य त्या वेळी होते. हैदराबाद चा निजाम जेव्हा मराठ्यांना दाद देईनासा झाला त्यावेळी इ. सन 1795 मध्ये समस्त मराठी सरदार शिंदे, भोसले, होळकर, पवार, जाधव,पेशवे यांनी एकत्र येऊन अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी निजामाला पाणी पाजले.या युद्धामुळे मराठ्यांच्या बाहुंना पुन्हा स्फुरण चढले, पानिपत च्या जखमा खर्‍या अर्थाने भरल्या गेल्या , त्यानंतर मात्र दुर्दैवाने परत कधीच मराठ्यांना अशी विजयश्री प्राप्त झाली नाही. अशी हि अखेरची शौर्यगाथा ज्या नगरजवळील खर्डा ऊर्फ शिवपट्टण या ठिकाणी घडली त्या युध्दभूमीचा खर्‍या अर्थाने मूक साक्षीदार म्हणजे खर्डा येथील भुईकोट किल्ला.


हा ऐतिहासिक किल्ला मराठवाड्याच्या सीमेवर, जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी एका छोट्याशा टेकडीवजा जागेवर आजही भरभक्कम अशा अवस्थेत उभा आहे.खर्ड्याच्या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास अहमदनगर हून जामखेड,तेथून खर्डा असा प्रवास करावा लागतो. खर्डा गावात प्रवेश करण्याआधीच उजव्या हाताला छोट्या टेकाडावर असलेला खर्ड्याचा भुईकोट किल्ला त्याच्या अभेद्य तटबंदीमुळे आपले लक्ष वेधून घेतो.टेकाडावरून गाडी रस्त्याने आपण उजवीकडे वळालो तर आपण थेट प्रवेशद्वारापाशीच पोहचतो.
चौकोनी बांधकाम असलेला हा छोटेखानी किल्ला बाहेरून परकोट व खंदक यांनी तर आतून चारही बाजूंचे चार व गडप्रवेशाचे दोन अशा मिळुन सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे.मुख्य प्रवेशद्वार सहजासहजी शत्रुला समजू शकणार नाही असं दोन बुरुजांच्या बेचक्यात उभे आहे.सध्या या प्रवेशद्वाराला लोखंडी गेट बसवले आहे,सकाळी 9 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आपण हा किल्ला पाहू शकतो. प्रवेशद्वारावरच एक फारशी शिलालेख आहे, या किल्ल्याची निर्मिती सरदार निंबाळकर यांनी 1743 साली केली,गडप्रवेश करताच समोरच पहारेकर्‍यांच्या सुंदर नक्षीकाम केलेल्या देवड्या आहेत, ते पाहून आपण एका मागोमाग एक अशा दुसर्‍या भव्यदिव्य प्रवेशद्वारापाशी येतो, या प्रवेशद्वारावर सुध्दा शिलालेख आहे, द्वितीयप्रवेशद्वाराच्या आत पहारेकरींसाठी असलेल्या देवड्यांमधून एक गुप्तवाट मुख्य दरवाजाच्या तटावर जाते. या एकात एक गुंफलेल्या देवड्या बघून आपण गडप्रवेश करायचा.सध्या गडावर संवर्धनाचे, डागडुजीचे काम चालू आहे. आत आल्यानंतर आपण लगेचचं डावीकडे वळायचे, बाजुला तटामध्येच दोन दारूकोठारं आहेत, दारूकोठारं पाहून पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला अर्धवट बुजून गेलेल्या दोन कमानी असलेल्या वास्तु दिसतात, त्या पाहून आपण कोपर्‍यातील दगडी जिन्याखाली असलेल्या भुयारवजा वास्तूजवळ येतो, वटवाघळांचे येथे वास्तव्य असल्याने आपण बाहेरूनच दर्शन घ्यायचे. पश्चिमेकडील तटामध्ये एका टोकाला दारूकोठारा सारखी वास्तू व दुसर्‍या टोकाला दगडांनी पुर्ण बंद करण्यात आलेला चोरदरवाजा आहे. गडाच्या आतल्या छोट्याशा भागात मशिदीची एक सुंदर वास्तु आहे. मशिदीच्या समोरच भग्न झालेली तोफ व चाकाचे अवशेष दिसतात, मशिदीच्या भिंतीवर सुध्दा एक शिलालेख कोरलेला आहे. मशिदीच्या मागेच गडाचे मुख्य आकर्षण असलेली अतिशय खोल अशी विहिर आहे.या विहीरीत उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे, पायर्‍या उतरल्यानंतर आपण विहिरीतील कमानीसारख्या जागेत पोहचतो, तेथून विहिरीची असलेली खोली आपल्या मनात धडकी भरवते, काळजीपूर्वक विहीर पाहिल्यानंतर आपण तटाकडे जाणाऱ्या दगडी जिन्याने वर जायचे,तटफेरी करताना आपणास किल्ल्यावरील सर्व अवशेषांचे, सभोवतालच्या प्रदेशाचे, किल्ल्याभोवतीच्या खंदक व परकोटाचे सुंदर दर्शन होते. तटफेरी करताना आपल्याला ध्वजस्तंभाचा बुरुज व सर्व बुरूजांवर तोफा फिरवण्यासाठी गोलाकार पद्धतीचे बांधकाम व त्याखाली दारूगोळा साठवण्याची खोली दिसून येते .

तटफेरी पूर्ण झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन, खंदक व परकोटाचे सर्व अवशेष पाहण्यासाठी आपण गडाला बाहेरून प्रदक्षिणा घालायची.या फेरीत खंदक, परकोटातील भुयारीमार्ग, पहारेकर्‍यांची देवडी,एक कोरडी विहीर, परकोटाची भग्न तटबंदी व बुरुज,बुजवलेल्या चोर दरवाजाचे अवशेष आपणास दिसून येतात. अशा रीतीने आपली संपूर्ण गडफेरी पूर्ण होते.

या किल्ल्याची निर्मिती करणारे सरदार निंबाळकर हे स्वतः शिवभक्त असल्याने त्यांनी शिवपट्टण गावात व सभोवार ओंकारेश्वर, कपिलेश्वर, कोटिश्वर अशी बारा सुंदर हेमांडपंथी शिवमंदिरं बांधली. गावामध्ये आजही गावाच्या दोन्ही वेशी,सरदार निंबाळकर यांची गढी,वाडा,ताकभाते यांचा वाडा तग धरुन उभे आहेत.गावातील ओढ्याच्या तीरावर सरदार निंबाळकर यांची आवर्जून पहावी अशी ,अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेली समाधी आहे. बाजुलाच इतर 2 समाध्या, एक सुंदर बांधकाम व शिलालेख असलेली पुरातन काळातील बारव आहे.गावातील मंदिरांमध्ये कित्येक सुंदर विरगळी, किर्तीमुखं, देवदेवतांची पुरातन शिल्पं आढळून येतात.

हे सर्व गावातील अवशेष, गावाच्या दोन्ही वेशी व भुईकोट किल्ला आजही तब्बल पावणेतीनशे वर्षे होऊन सुध्दा ताठ मानेनं मराठ्यांच्या दैदिप्यमान व वैभवशाली इतिहासाची,त्यांच्या पराक्रमाची निशाणी आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहेत..!
माहिती आणि फोटोज - संग्राम इंदोरे (Sangram Indore)
Source

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने